बिल्डरांना आता पार्किंगची सगळी माहिती द्यावी लागणार !

By सचिन लुंगसे | Published: April 25, 2024 01:08 PM2024-04-25T13:08:17+5:302024-04-25T13:10:59+5:30

Mumbai News: विकासकांकडून विकत घेतलेल्या आच्छादित, मेकॅनिकल, गॅरेज पार्किंग  मध्ये इमारतीच्या बीममुळे वाहन पार्क करता येत नाही,  पार्किंग लहान असल्याने वाहन पार्क करता येत नाही, वाहन पार्क केल्यानंतर बाहेर पडायला जागा नाही, दरवाजा उघडताच येत नाही या आणि अशा अनेक तक्रारी पार्किंगच्या अनुषंगाने महारेराकडे आलेल्या आहेत.

Builders now have to give all the information about parking! | बिल्डरांना आता पार्किंगची सगळी माहिती द्यावी लागणार !

बिल्डरांना आता पार्किंगची सगळी माहिती द्यावी लागणार !

मुंबई - विकासकांकडून विकत घेतलेल्या आच्छादित, मेकॅनिकल, गॅरेज पार्किंग  मध्ये इमारतीच्या बीममुळे वाहन पार्क करता येत नाही,  पार्किंग लहान असल्याने वाहन पार्क करता येत नाही, वाहन पार्क केल्यानंतर बाहेर पडायला जागा नाही, दरवाजा उघडताच येत नाही या आणि अशा अनेक तक्रारी पार्किंगच्या अनुषंगाने महारेराकडे आलेल्या आहेत. महारेराने याची गंभीर नोंद घेतली. घर खरेदीदारांना भविष्यात अशा समस्यांना सामोरे जायला लागू नये यासाठी सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या नियतवाटप पत्रात ( Allotment letter) आणि केल्या जाणाऱ्या विक्री करारांमध्येच ( Agreemet for Sale) पार्किंगचा सर्व तपशील असलेले जोडपत्र जोडणे बंधनकारक केलेले आहे.

या जोडपत्रात जेथे पार्किंग दिले जाणार आहे तिथला क्रमांक, पार्किंगचा आकार, उंची , रुंदी ,  पार्किंगचे इमारतीतील ठिकाण याबाबतच्या सर्व तपशीलाचा उल्लेख करावा लागणार आहे.  यात कुठल्याही त्रुटी राहू नये यासाठी महारेराने या जोडपत्राचा आदर्श मसुदाही जारी केला आहे. डिसेंबर 22 मध्ये महारेराने जारी केलेल्या प्रमाणित ( Standardized) विक्री करारात दैवी आपत्ती ( Force Majeure) चटई क्षेत्र ( Carpet Area) दोष दायित्व कालावधी ( Defect liability period) आणि हस्तांतरण करार ह्या बाबी प्रत्येक विक्री करारात बंधनकारक केलेल्या आहेत. याबाबत घर खरेदीदाराच्या संमतीने कुठलेही बदल केलेले असले तरी ते महारेराला मान्य होणार नाही, असे महारेराने जाहीर केलेले आहे. महारेराना आता या चार निकषांमध्ये पार्किंगचाही समावेश केला आहा. येथून पुढे पार्किंगचे संपूर्ण तपशील असलेल्या विहित जोडपत्राबाबत महारेरा आग्रह राहणार आहे. यामुळे पार्किंगच्या अनुषंगाने वाद उद्भवून नवीन जागेत गेल्यानंतर जो मनस्ताप घर खरेदीदारांना सहन करावा लागतो , तो येथून पुढे सहन करावा लागणार नाही.

- यापूर्वी महारेराने 30 जुलै 2021 ला परिपत्रक क्रमांक 36 अन्वये पार्किंगच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. यात खुला पार्किंग एरिया हा चटई क्षेत्रात मोजल्या जात नसल्यामुळे त्यासाठी विकासक पैसे आकारू शकत नाही, हे स्पष्ट केलेले आहे. शिवाय गॅरेज, अच्छादित पार्किंग याबाबतही या परिपत्रकात स्पष्टपणे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. पार्किंगबाबत  आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ग्राहकहित अधिक संरक्षित करण्यासाठी, हे नवीन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.
- विकासकांकडून सशुल्क घेतलेल्या किंवा मिळालेल्या  पार्किंग बाबत वाद उद्भवू नये यासाठी पार्किंगचा आकार , रुंदी , उंची, पार्किंग क्रमांक,इमारतीतील पार्किंगचे प्रत्यक्षातील ठिकाण इत्यादी बाबत महारेराचे स्पष्ट निर्देश
- आता  सदनिका नोंदणीनंतर दिल्या जाणाऱ्या नियतवाटप पत्रात (Allotment letter)  आणि केल्या जाणाऱ्या विक्री करारासोबत (Agreement for Sale) जोडपत्र देऊन त्यात या सर्व बाबींचा तपशील स्पष्टपणे नोंदवणे बंधनकारक
- यासाठी महारेराने  जारी केले अच्छादित पार्किंग  , गॅरेज, खुले पार्किंग, मेकॅनिकल पार्किंग असे वर्गवारीनुसार द्यायचे करारांसोबतचे जोडपत्र
 - प्रमाणित विक्री करारातील दैवी आपत्ती, दोष दायित्व कालावधी, चटई क्षेत्र आणि हस्तांतरण करार या 4 अपरिवर्तनीय ( non - negotiable ) बाबींप्रमाणेच पार्किंगही आता अपरिवर्तनीय

Web Title: Builders now have to give all the information about parking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.