'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:53 PM2024-05-02T14:53:53+5:302024-05-02T14:54:23+5:30

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या ऑफरवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Maharashtra Politics Sanjay Raut reaction to Devendra Fadnavis offer of Chief Ministership | 'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर

'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut On Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनीएकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मला फोन करुन मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. एकनाथ शिंदेंना सोबत न घेता तुम्ही मुख्यमंत्री बना असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फार मोठं कर्तृत्व आहे असं मी मानत नाही, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली.

शिवसेनेच्या फुटीनंतर  ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या राजकीय भूकंपावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावर आता टीव्ही९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

"फडणवीस शिंदेंसोबत गेले हे सांगायला शिंदे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आहेत का? काय बोलतात देवेंद्र फडणवीस. मोदी आणि शाहांनी मुख्यमंत्री पदाच्या लायक समजलं नाही याचं त्यांना दुःख पाहिजे. मुख्यमंत्री होते पण दुसरे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. या राजकारणामुळे ते निराश आणि वैफल्यग्रस्त आहेत. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने झिडकारलं आहे. काही काळ मुख्यमंत्री होते म्हणून महाराष्ट्राला माहिती झाले. बाकी काय त्यांचे फार मोठं कर्तृत्व आहे असं मी मानत नाही," असं संजय राऊत म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे ४ जूननंतर बोलण्याच्या लायकीचे नसतील. भाजपने तुम्हाला भाड्याने घेतलं आहे. तु्म्हाला ते काम करावचं लागणार आहे नाहीतर नोकरी जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

"उद्धव ठाकरेंचा मला सकाळी फोन आला. तेव्हा त्यांनी बंडखोरांना का सोबत घेताय, असा प्रश्न केला. शिंदेंना एखादं पद तुम्ही का देताय, असा सवालही त्यांनी केला. संपूर्ण शिवसेना पक्ष तुमच्यासोबत घेऊन येतो, अशी ऑफर तेव्हा ठाकरेंनी दिली होती. उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला, मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी उद्धव ठाकरेंना सांगितलं की वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याचं मी ठाकरेंना सांगितलं. जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नाही, असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं," असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
 

Web Title: Maharashtra Politics Sanjay Raut reaction to Devendra Fadnavis offer of Chief Ministership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.