महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:38 PM2024-04-29T15:38:12+5:302024-04-29T15:42:14+5:30

राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोलकात्याच्या वाटेने मुंबईला जाऊ देऊ नये,असेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे

Maharashtra Politics For the bright future of Maharashtra our self esteem has somehow been put aside says pm modi | महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'

महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'

PM Narendra Modi : राज्यात फक्त फोडाफोडीचे राजकारण झाले. आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे आहेत, अशी टीका एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दुसरीकडे आता, कोलकात्याप्रमाणे मुंबईला उद्ध्वस्त होऊ देता येणार नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईला स्थिर सरकारसोबत भक्कमपणे पुढे जाण्याची गरज आहे. एकेकाळी देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या पण राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोलकात्याच्या वाटेने मुंबईला जाऊ देऊ नये,असे मोदी म्हणाले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

न्यूज १८ दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरहं भाष्य केलं. “बंगाल उद्ध्वस्त झाला आहे. कोलकाता एकेकाळी आर्थिक विकासात अग्रेसर होते. पण राजकारणाने ते उद्ध्वस्त झाले. महाराष्ट्राने त्या वाटेने जाऊ नये. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशहितासाठी महाराष्ट्रात भक्कमपणे पुढे जायला हवे. ही भावना आम्ही महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही त्यांना पटवून देत आहोत आणि आम्हाला महाराष्ट्रातील लोकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वीही अस्थिर परिस्थिती होती.पण महाराष्ट्रात बऱ्याच काळापासून युतीची सरकारे दिसत आहेत आणि काही काळापासून एकही मुख्यमंत्री ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही.इथे विलासराव देशमुख होते. शरद पवार देखील इथे मुख्यमंत्री होते. पण पूर्ण बहुमत असतानाही त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.महत्त्वाचे म्हणजे,गेल्या काही काळापासून एकाही मुख्यमंत्र्याला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. बऱ्याच कालावधीनंतर आपला कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले व्यक्ती होते. तेव्हाचे सरकार स्वच्छ आणि निष्कलंक होते. जनतेच्या हिताचे काम करणारे सरकार होते,” असेही पंतप्रधान म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी युतीशी गद्दारी केली

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी युती तोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील फरकही सांगितला. "ज्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली, ज्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्रातील जनतेकडे मते मागितली त्यांचा मुख्यमंत्री होण्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे अहंकार वाढला.आपल्या अहंकार आणि महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या युतीशी गद्दारी केली. लोकांमध्ये याचा राग आहे आणि भाजपबद्दल सहानुभूती आहे,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

यंदा आमच्या बाजूने सहानुभूती आहे - पंतप्रधान मोदी

“भाजपने महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे. काही लोकांना वाटले की आम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे.पण  नाही.आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ शकलो असतो पण तसे केले नाही. आम्ही स्वतःसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी जगतो हे आम्ही महाराष्ट्रातील जनतेला पटवून दिले. या निवडणुकीत ही सहानुभूती आमच्या बाजूने आहे कारण एवढ्या मोठ्या पक्षात यशस्वी असलेला मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहे.महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आपला स्वाभिमान एकप्रकारे बाजूला टाकला आहे,” असंही मोदींनी म्हटलं.

शरद पवारांच्या घरात कौटुंबिक वाद

“दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवसेना किंवा राष्ट्रवादीतील वादळावरून हे स्पष्ट झालं की, जेव्हा तुम्ही इतर नेत्यांपेक्षा केवळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांना महत्त्व देता तेव्हा काय होते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात.  मुलीने किंवा पुतण्याने पक्षाची धुरा सांभाळावी हा शरद पवारांच्या घरातील वाद हा त्यांचा कौटुंबिक वाद आहे. सक्षम नेत्याला नेतृत्व द्यायचे की मुलाला हे काँग्रेसप्रमाणे शिवसेनेतही सुरु आहे,” असं मोदींनी सांगितले. 

Web Title: Maharashtra Politics For the bright future of Maharashtra our self esteem has somehow been put aside says pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.