‘सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर आणि वेडेपिसे झालेत, मी पोराटोरांवर…’ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:16 AM2024-04-24T10:16:22+5:302024-04-24T10:17:07+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अटकेची भीती वाटत होती. त्यामुळेच ते भाजपासोबत गेल्याची टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच मी पोराटोरांवर बोलत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Eknath Shinde's Reply to Aditya Thackeray & Uddhav Thackeray | ‘सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर आणि वेडेपिसे झालेत, मी पोराटोरांवर…’ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

‘सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर आणि वेडेपिसे झालेत, मी पोराटोरांवर…’ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे भाजपासह शिवसेना शिंदे गटावर सातत्याने बोचरी टीका करत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती वाटत होती. त्यामुळेच ते भाजपासोबत गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच मी पोराटोरांवर बोलत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडावून सापडलं होतं. तेव्हा आमच्यासोबत येता की आत टाकू अशी धमकी त्यांना दिली गेली होती. त्यामुळेच ते भाजपासोबत गेले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून होत असलेले हे आरोप आणि टीकेला एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमधून प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राची आपली एक राजकीय संस्कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्र सर्वांनी पाहिला आहे. पण सध्या जे काही खालच्या पातळीवरचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कमरेखालचे वार, ह्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत. लोकांना विकासावर बोलणं हवं आहे. आज जे काही आरोप होताहेत त्याबाबत बोलायचं तर सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरभैर झाले आहेत. वेडेपिसे झाले आहेत. त्यामुळे त्यांचं संतुलनपण बिघडलेलं आहे. बाकी पोराटोरांवर मी बोलत नाही. त्यांचं वय किती, त्यांच्या कामाचा अनुभव किती, त्यांचं पक्षासाठी योगदान किती, आज त्यांच्या वयापेक्षा जास्त काम केलेल्या लोकांकडून पाया पडून घेणं हे लोकांना आवडत नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजत असत. परंतु हे सरंजामशाहीप्रमाणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी नोकर समजतात. यामुळेच तर हा सगळा इतिहास घडला आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिंदे पुढे म्हणाले की, आरोप करण्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे. लंडनच्या विश्रांतीचा उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय होतं. लखनौमध्ये चतुर्वेदी यांची २०० एकर जमीन प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. त्याच्यासोबत कोण आहे, हे सगळं आम्हाला माहिती आहे. लंडनमधील प्रॉपर्टी कुणाच्या आहेत, याची सगळी कागदपत्रे आमच्याकडे आहेत, पण आम्ही एक मर्यादा पाळतो. राजकारणामध्ये राजकीय गणितं असतात, आरोप प्रत्यारोप असतात. मात्र वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं हे बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे यांनी आम्हाला शिकवलेलं नाही. हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले, हे दुर्दैव आहे. मला त्यावर काही जास्त बोलायचं नाही आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Eknath Shinde's Reply to Aditya Thackeray & Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.