“भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:51 PM2024-04-23T17:51:38+5:302024-04-23T17:53:09+5:30

Congress Nana Patole News: राहुल गांधी केव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले.

congress nana patole replied cm eknath shinde over criticism on rahul gandhi in rally for lok sabha election 2024 | “भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार

“भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार

Congress Nana Patole News: राहुल गांधी कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान हास्यास्पद आहे. लोकशाही व्यवस्थेत कोण पंतप्रधान होणार, मुख्यमंत्री, मंत्री होणार हे जनतेच्या हातात आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभर आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाचे ते नेते आहेत, त्यांनी ठरवले असते तर २००४ ते २०१४ या दहा वर्षात ते केव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? लोकसभा निवडणुकीनंतर तुमची अवस्था काय असेल त्याची चिंता एकनाथ शिंदे यांनी करावी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची चिंता करु नये, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला. 

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारच असंवैधानिक आहे. भारतीय जनता पक्षाने कट कारस्थान करुन महाविकास आघाडीचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. शिंदे यांच्याकडे स्वतःचा पक्ष नाही, पक्षाचे चिन्ह नाही, ते सर्व चोरून आणलेले आहे. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री बनले आहेत, जोपर्यंत शिंदे यांची गरज आहे तोपर्यंत ते त्यांचा वापर करुन घेतील व एकदा का त्यांची गरज संपली की ‘वापरा व फेकून द्या’ प्रमाणे एकनाथ शिंदे यांची अवस्था होईल, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.

मोदी-शाहांचे गुणगान करण्याशिवाय एकनाथ शिंदेंना पर्याय नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोदी-शहांचे गुणगान गावे लागणार आहेत कारण शिंदे यांना त्याशिवाय पर्याय नाही. भाजपा सरकारच्या काळात देशभरात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने दलित व मुस्लीमांचा व्होट बँक म्हणून वापर केला असे बोलण्याआधी एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करायला हवा, अशी टीका नाना पटोलेंनी केली. 

दरम्यान, स्वातंत्र्यापासून ६०-६५ वर्ष देशात सर्व जाती धर्माचे लोक भयमुक्त वातावरणात रहात होते ते काँग्रेस सरकारमुळेच. भाजपाच्या राज्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज जीव मुठीत घेऊन जगत आहे याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणीव नाही. भाजपाने सांगितले तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये, या शब्दांत नाना पटोलेंनी निशाणा साधला.
 

Web Title: congress nana patole replied cm eknath shinde over criticism on rahul gandhi in rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.