मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:52 PM2024-03-26T12:52:58+5:302024-03-26T13:14:54+5:30

Mahavikas Aghadi: निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे , असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

Big set back to Mahavikas Aghadi Prakash Ambedkars appeal to vba party workers | मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले...

मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले...

VBA Prakash Ambedkar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही वंचितसोबतचे जागावाटप निश्चित करण्यात मविआच्या नेत्यांना अपयश आलं. असं असलं तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याची वाट पाहू, अशी भूमिका आतापर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती. परंतु आज प्रकाश आंबेडकर हे निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता असून याबाबतचे संकेत त्यांनी एक व्हिडिओ जारी करून दिले आहेत. आपल्या चळवळीला लाचार करत संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

"वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन," अशा शीर्षकाखाली वंचित आघाडीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, "वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वंचित आघाडीने युतीबाबत काय केले पाहिजे, याबाबतचा सल्ला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही. निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापीही मान्य करणार नाही," असं म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या मविआला इशारा दिला आहे. 

आपल्या समर्थकांना आवाहन करताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, "मी सर्व शाहू-फुले-आंबेडकरवादी मतदाराला मी सांगतो की, काही गोष्टी उघड बोलू शकत नाही, मात्र काही ठिकाणी आपण जिंकणार आहोत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चळवळीचा विचार हा सर्वांत महत्त्वाचा आहे. आपण सार्वजनिक जीवन जगतो आणि जो सार्वत्रिक निर्णय आहे, त्याला आपण सर्वांना मान्य केलं पाहिजे. तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल, त्या भूमिकेला शाहू-फुले-आंबेडकरी विचाराच्या प्रत्येकाचा पाठिंबा असेल, असं मी गृहित धरतो," अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला आज सुधारित प्रस्ताव पाठवला जाण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत असा प्रस्ताव दिला जातो का आणि याबाबत प्रकाश आंबेडकर नक्की काय निर्णय घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Big set back to Mahavikas Aghadi Prakash Ambedkars appeal to vba party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.