लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:39 AM2024-05-06T08:39:43+5:302024-05-06T09:40:49+5:30

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असून या निवडणूक निकालानंतर राज्यातील २ पक्ष संपतील असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. 

After the Lok Sabha elections, 2 parties will cease to exist in the state; Congress Leader Prithviraj Chavan's claim | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

कराड - Prithviraj  Chavan on BJP ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ राजकीय पक्ष लोप पावेल, या पक्षांचं अस्तित्व दिसणार नाही किंवा यातील लोक इतर पक्षात जातील असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. 

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज राज्यात ६ पक्ष एकमेकांविरोधात उभे आहेत. ३ एकाबाजूला तर ३ दुसऱ्याबाजूला आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर किमान २ पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीनीकरण होईल किंवा माणसं इकडे तिकडे पळतील. राज्यात ६ पैकी २ राजकीय पक्ष राहणार नाहीत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाविकास आघाडीकडे राज्यात ४८ पैकी जास्तीत जास्त जागा येतील. हे निकाल अनपेक्षित असतील. महाराष्ट्रात मविआला चांगला प्रतिसाद आहे. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल असा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आता मोदी नको, अशी सुप्त लाट राज्यात आहे. तुम्ही ४०० पार चा नारा दिला आहे. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने मोदी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात नसलेल्या गोष्टी बोलतायेत. १० वर्ष सत्तेत असलेले सरकार त्यांच्या कामगिरीचा आढावा देत नाही. भाजपाच्या जाहिरनाम्याबाबत मोदी बोलत नाही असा निशाणा पृथ्वीराज चव्हाणांनी साधला. 

उदयनराजेंचा पराभव निश्चित, दीड लाखांच्या फरकानं पडणार 

महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आणि संविधान बचाव या ५ मुद्द्यावरून आमचा प्रचार होता. उदयनराजे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकिटावर आम्ही निवडून दिले होते. पण २०१९ ला त्यांनी पक्ष बदलला. भाजपाची साथ धरली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं मिळून उदयनराजेंचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. आता आम्ही ३ पक्ष आहोत. त्यामुळे दीड लाखांच्या फरकाने उदयनराजेंचा पराभव नक्कीच होणार आहे.  सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेने तीन वेळा उदयनराजेंना निवडून दिले, त्यानंतर चौथ्यांदा पाडले. जनतेला त्यांच्या खासदारकीची कारकि‍र्द, लोकसभेत मांडलेली भूमिका, भाषणे याकडे लोकांचे लक्ष असते. कराड दक्षिण, पाटण, कराड उत्तर या भागात उदयनराजे कितीदा आले? लोकांच्या सुखदुखात ते गेले का? हा विचार सामान्य माणूस करतो. आम्ही गेलो तर भेट होईल का असा विचार लोकांच्या मनात असतो. त्यामुळेच उदयनराजेंचा ९० हजार मतांनी पराभव झाला. आता उदयनराजेंचा पराभव होईल त्याबाबत शंका नाही. फक्त किती फरकाने असेल हे पाहावे लागेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला. 

बारामतीत मोदींविरोधात संताप, सुप्रिया सुळे विजयी होतील 

बारामतीत एकतर्फी सुप्रिया सुळेंचा विजय होईल, भोर, पुरंदरच्या काँग्रेस आमदाराची महत्त्वाची भूमिका आहे. या मतदारसंघात संघर्ष आहे. घरातलं भांडण आहे. मात्र शरद पवारांबाबत कृतज्ञता भावना आहे, पवारांनी बारामतीला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं. शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते? हा प्रश्न लोक विचारतात, निवडणुकीत जी भाषा वापरली जातेय, जे काही घडले ते लोकांना आवडले नाही. मोदींनी शरद पवारांबाबत जे उद्गार काढले त्यावर लोकांचा संताप आहे असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले. 
 

Web Title: After the Lok Sabha elections, 2 parties will cease to exist in the state; Congress Leader Prithviraj Chavan's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.