LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 01:18 PM2024-05-09T13:18:54+5:302024-05-09T13:21:57+5:30

मतमोजणी ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून

Voting machines containing the political fortunes of candidates in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha elections are sealed in the strong room | LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची 

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : जिल्ह्यात कोल्हापूरहातकणंगले लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे राजकीय भवितव्य सामावलेली मतदान यंत्रे बुधवारी दुपारी स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद झाली. कोल्हापूर मतदारसंघातील यंत्रे रमणमळा येथे, तर हातकणंगले मतदारसंघातील यंत्रे राजाराम तलाव येथील गुदामात ठेवण्यात आली असून, ते मतमोजणीपर्यंत केंद्रीय पोलिस पथक, एसआरपीएफ व राज्य पोलिसांच्या त्रिस्तरीय सुरक्षेत असणार आहेत. मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात मंगळवारी मोठ्या चुरशीने व उत्साहाने ७१ टक्क्यांवर मतदान झाले. अनेक केंद्रांवर सायंकाळी ६ वाजून गेल्यानंतरही रात्री ८-९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे लोकप्रतिनिधींच्या उमेदवारांच्या समोर सीलबंद करून विधानसभा मतदारसंघात आणायलाच मध्यरात्र झाली. येथे मतदान यंत्रे स्वीकारल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर त्यांची छाननी झाली, त्यानंतर पहाटे ४ वाजल्यापासून मतदान यंत्रे गुदामाच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली.

कोल्हापूर मतदारसंघासाठी मतदान झालेली यंत्रे रमणमळा येथे तर हातकणंगले मतदारसंघासाठी मतदान झालेली यंत्रे राजाराम तलाव येथील गुदामात मतदारसंघनिहाय स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली. शेवटची गाडी सकाळी ६ वाजता दाखल झाली. त्यानंतर छाननी, मतदान यंत्रांची संख्या ही पडताळणी झाल्यावर सकाळी साडेदहा वाजता निवडणुकीसाठी नियुक्त ऑब्झर्व्हर आले. त्यांच्यासमोर सर्व यंत्रांचे सीलिंग करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया व्हायला दुपारचे १२ वाजले.

रात्रभर चालली प्रक्रिया

मंगळवारपासून ते बुधवारी दुपारपर्यंत मतदान यंत्रे सील करणे, त्यांचे संकलन, वाहतूक, गुदामाच्या ठिकाणी ते आणणे, सर्व यंत्रे मिळाल्याच्या नोंदी करणे, छाननी, मतदारसंघ निहाय स्ट्राॅंग रूममध्ये ठेवणे, त्यांचे सीलिंग हे सगळे काम प्रचंड तणावाचे आणि वेळखाऊ असते. निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी रात्रभर याकामात व्यस्त होते. बुधवारी दुपारी १ वाजता सगळे आपापल्या घरी परतले. आता मतमोजणीची तयारी सुरू होणार आहे.

शासकीय कार्यालये ओस..

बुधवार दुपारपर्यंत सर्व कर्मचारी मतदान यंत्रांची व्यवस्था लावण्याच्या कामातच व्यस्त असल्याने सर्व शासकीय कार्यालये ओस पडली होती. मोजके कर्मचारी वगळता कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. आज गुरुवारपासून कार्यालयांच्या नियमित कामकाजाला सुरुवात होईल.

आचारसंहितेत सूट नाही..

ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे तेथील आचारसंहितेच्या नियमात सूट देण्याचे कोणतेही निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले नाहीत, त्यामुळे कोल्हापुरातील निवडणूक पार पडली असली तरी आचारसंहितेत कोणतीही सूट दिली जाणार नाही. शासकीय कार्यालयांचे नियमित कामकाज, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत कामासंबंधीच्या बैठका सुरू राहतील. मात्र मंत्री, लोकप्रतिनिधींच्या बैठका होणार नाहीत. आचारसंहिता ६ जून रोजी संपेल.

Web Title: Voting machines containing the political fortunes of candidates in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha elections are sealed in the strong room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.