राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:00 AM2024-05-02T10:00:18+5:302024-05-02T10:01:18+5:30

Prasad oak: प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेल्या 'कच्चा लिंबू' या सिनेमासाठी त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

prasad-oak-shared-his-first-national-award-memories-and-talks-about-financial-crisis | राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';

मराठी कलाविश्वातील ऑल राऊंडर अभिनेता म्हणून आज प्रसाद ओकने (prasad oak) त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका, सिनेमा या तीनही माध्यमांमध्ये सक्रीय असलेल्या प्रसादने अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक म्हणूनही तितकीच लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे प्रसादने दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमा सुपरहिट झाले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीत आज त्याच नाव मानाने घेतलं जातं. परंतु, अमाप यश मिळवणाऱ्या प्रसादवर एकेकाळी त्याचं घर विकावं लागलं होतं. एकीकडे त्याच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत होता आणि दुसरीकडे त्याचं घर विकलं जात होतं.

अलिकडेच प्रसादने 'कॉकटेल स्टुडिओ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी भाष्य केलं. प्रसादला २०१७ मध्ये कच्चा लिंबू या सिनेमासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. परंतु, याच वर्षी त्याचं राहतं घर त्याला विकावं लागलं होतं.

पहिल्याच सिनेमाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

'कच्चा लिंबू' हा सिनेमा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा भाग आणि घटक आहे. याला मुळात मी चित्रपट म्हणणार नाही. कारण, या कलाकृतीने मला खूप काही दिलं आहे. अर्थात यामुळे आयुष्यातील अनेक गोष्टी गेल्या. पण, हाच एक प्रवास आहे. ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ असं म्हणतो ना अगदी तसंच झालं. तो चित्रपट एक ते दोन आठवडे अगदी कसाबसा चालला. त्यानंतर तो उतरला. पण, त्या माझ्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. असं भाग्य कोणत्या दिग्दर्शकाच्या नशिबात असतं? हा चित्रपट मी फार वेगळ्या विचाराने केला होता. विशेष मुलांकडे पाहण्याचा समाजाचा असलेला दृष्टीकोन कसा बदलला पाहिजे, एखाद्या सण-समारंभात लोक त्या मुलाकडे कशा पद्धतीने बघतात. लोकांच्या त्या नजरेचा संबंधित मुलाच्या आई-वडिलांना भयंकर त्रास होत असतो. त्यामुळे ही विशेष मुलं समारंभाला येत नाहीत. कालांतराने पालकही अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. पण, तो मुलगा तसा आहे यात त्या मुलाचा काय दोष? विशेष मुलांच्या आई-बाबांना प्रचंड भोगावं लागतं. त्यामुळे आपल्या समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी अत्यंत प्रामाणिक हेतूने मी हा चित्रपट बनवला होता,” असं प्रसाद म्हणाला.

डोक्यावर होता कर्जाचा डोंगर

"प्रत्येक सिनेमासाठी मी मेहनत घेत असतो. त्यात काही मोठेपणा नाही. पण, त्या सिनेमासाठी मी जवळपास पावणे दोन वर्ष मेहनत घेतली होती त्याकाळात मी दुसरी कोणतीच काम केली नाही. मुळात या काळात आपण काहीच काम केलं नाही हे त्यावेळी लक्षात आलं ज्यावेळी कर्जाचे हप्ते जास्त झाले आणि बँकेच्या माणसांचे फोन येऊ लागले. आपण काही कमावलेलंच नाही. पण, आपण कमावलं नाही म्हणून बँकेचे हप्ते थांबत नाहीत ते चालूच राहतात."

विकावं लागलं घर

"त्या दोन वर्षांमध्ये काम न करणं एवढं अंगाशी आलं की, पुण्यामध्ये मी एक छान टुमटार रो-हाऊस घेतलं होतं. ते घर खूपच सुंदर होतं. माझ्या बायकोने ते घर स्वत:च्या हाताने शेणाने सारवलं होतं. त्या घरातील एक-एक ताट, वाटी, भांडी सगळ्या गोष्टी पितळेच्या होत्या. तिने फार शोधाशोध करून ते सगळं शोधून आणलं होतं. त्या घरात स्टिलच्या वस्तू नव्हत्या. अगदी फ्रिज सुद्धा मातीचा आणला होता. समोर बैलगाडी बनवली होती, मागे खोटी विहीर, मोट होती. त्या घरात आम्ही दोन वर्षे पुण्याला जाऊन-येऊन राहिलो. पण, ‘कच्चा लिंबू’च्या प्रवासात ती दोन वर्षे काम न केल्यामुळे मला नाईलाजास्तव ते घर विकावं लागलं. ते घर विकून मी माझ्या बायकोच्या आनंदावर विरजण टाकलं. खरंतर मला तो अधिकार नव्हता. एखादी कलाकृती खूप सुंदर व्हावी म्हणून मी इतर काही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला माझ्या बायकोची पूर्ण संमती होती पण, शेवटी नाईलाज म्हणून मला तिच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं आणि आम्ही ते घर विकलं.” 

Web Title: prasad-oak-shared-his-first-national-award-memories-and-talks-about-financial-crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.