पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 05:44 AM2024-04-24T05:44:36+5:302024-04-24T05:46:15+5:30

पंतप्रधान असत्य बोलले ही बातमी नाही, जे सर्वांना दिसते आहे  त्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली, ही खरी बातमी आहे!

Special Article - Low polling in the first phase has raised BJP's anxiety, making Modi emotional | पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील?

पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील?

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान

नरेंद्र मोदी खोटे बोलले ही बातमी नाही. खोट्याच्या ढिगाऱ्याखालून बाहेर आलेले सत्य त्यांना सार्वजनिक व्यासपीठावर मान्य करावे लागले ही खरी बातमी आहे.’ असे मी माझ्या मित्रांना म्हटले. ते नुकतेच यू-ट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बासवाडा येथे झालेले निवडणूक प्रचाराचे भाषण ऐकून आले होते. उद्विग्नतेने मला म्हणाले, ‘इतक्या मोठ्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने असे बोलावे? एका पंतप्रधानांनी आपल्या आधीच्या पंतप्रधानांच्या विधानाची इतकी मोडतोड करावी? आणि तुम्ही म्हणता, ही बातमी नाही?’ मी म्हणालो, ‘भावा, ज्यात काही नवीन असते, त्याला बातमी म्हणतात ना!’

एक सज्जन शेजारी होते. जरा संकोचत ते मध्ये बोलले ‘मी आपल्या दोघांचे बोलणे ऐकले. आपण दोघे सांगत आहात की पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारसभेत एक असत्य विधान केले; परंतु मी आत्ताच व्हॉट्सॲपवर एक क्लिप पाहिली. मी माझ्या कानांनी ऐकले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह  स्पष्टपणे मुसलमानांचा उल्लेख करत म्हणत होते की या देशाच्या साधनसामुग्रीवर त्यांचा पहिला अधिकार असला पाहिजे. ते भाषण खूपच जुने होते; आणि त्याचा संदर्भ देण्याची काही आवश्यकता नव्हती; पण तुम्ही त्याला असत्य का म्हणता?”

शेवटी मी सविस्तर उत्तर देण्याचे ठरवले, “आपल्या पंतप्रधानांनी एक नव्हे, एका झटक्यात तीन असत्य विधाने केली. पहिले असत्य हे की, मुसलमानांचा देशाच्या साधनसामग्रीवर पहिला अधिकार असला पाहिजे असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले. आपण ज्या १० सेकंदाच्या क्लिपचा उल्लेख करता ती भाजपच्या माध्यम कक्षाने त्यांच्या भाषणातील एका परिच्छेदात शेवटची दोन वाक्ये कापून तयार केली आहे. हे भाषण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये दिल्लीत दिले होते. देशाच्या विकासात मागे राहिलेल्या समुदायाला उचित अधिकार मिळाले पाहिजेत, असा त्यांचा मुद्दा होता. 

ज्या परिच्छेदातून ही क्लिप तयार करण्यात आली तिच्यात ते सर्व वंचित वर्ग, दलित, आदिवासी, मागास, महिला, मुली आणि अल्पसंख्यक विशेषत: मुसलमान अशी नावे या क्रमाने घेतात आणि म्हणतात की देशाच्या साधन संपत्तीवर या सर्व वर्गांचा पहिला अधिकार असला पाहिजे. योगायोग फक्त एवढाच की त्यांनी या सर्व वर्गांची गणना करून झाल्यावर शेवटी ‘अल्पसंख्याक विशेषत: मुसलमान’ असा उल्लेख केला. मधले सगळे गाळून, पहिले आणि शेवटचे अशी दोन वाक्ये जोडून भाजपने असा दुष्प्रचार सुरू केला की ते केवळ मुसलमानांसाठी बोलत होते.’
नेमके काय झाले, हे  लक्षात येऊ लागल्यावर ते म्हणाले, ‘ हा तर खोडसाळपणा झाला; पण मग पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ही गोष्ट त्याचवेळी स्पष्ट का नाही केली?’ 

मी त्यांना म्हणालो, ‘ हे भाषण २००६ मध्ये दिले गेले ते भाजपने मोडतोड करून त्याचवेळी समोर आणले. पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करून तेव्हाच त्याचे खंडन केले होते आणि पंतप्रधानांच्या भाषणातील आशय पुन्हा स्पष्ट केला होता. दुसरे असत्य हे की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशाची संपत्ती मुसलमानांमध्ये वाटून टाकावी असा काही उल्लेख आहे. वास्तवात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुसलमानांचा उल्लेखही नाही. या जाहीरनाम्यात अल्पसंख्याकांबाबत जे म्हटले आहे, ते तर आधीच्या काही निवडणुकांमध्ये भाजप स्वतः म्हणत असे. या जाहीरनाम्यात देशाच्या संपत्तीची पुनर्वाटणी करण्याचा संदर्भच नाही. तिसरे असत्य हे की,  भारतातील मुसलमान घुसखोर आहेत. देशातील जवळपास २० कोटी मुस्लिम लोकसंख्येतील  मूठभर कुटुंबे सोडली तर बाकी सर्वजणांची मुळे अनंत काळापासून  या देशाच्या मातीत रुजलेली आहेत!”

शेवटी माझे मित्र म्हणाले, ‘तुम्ही म्हणता, बातमी तर वेगळीच आहे, ती कोणती?’ मी म्हणालो, ‘खरी बातमी अशी की, पहिल्या फेरीत ज्या १०२ जागांवर निवडणूक झाली आहे तिथे भाजपासाठी बरे वातावरण नाही.मागच्या निवडणुकीत या जागांवर ७० टक्के मतदान झाले होते. यावेळी ते ६६ टक्क्यांपर्यंत आले. मागच्या वेळच्या तुलनेत सुमारे ६४ लाख मतदार घरी बसून राहिले. जेथे भाजपाची हवा होती त्या जागांवर किमान पाच टक्के मतदान कमी झाले आहे.  हवेची दिशा बदलली आहे. नागपूर आणि दिल्लीत आणीबाणीच्या बैठका होत आहेत. छिद्र पडलेल्या फुग्यात भरायला प्राणवायू शिल्लक नसल्यामुळे विषारी हवा भरली जात आहे. प्रकरण पुन्हा हिंदू मुसलमानांवर उतरावे यासाठी अशी भाषणे केली जात आहेत.  पंतप्रधानांनी भाषणाच्या शेवटी अत्यंत भावुक आवाहन केले. ‘इच्छा असेल त्यांना मत द्या, पण मतदान जरूर करा’ याचा अर्थ ते आपल्या समर्थकांना सांगत आहेत, ‘पहिल्या फेरीत झटका बसला आहे; आता कसेही करून त्याची भरपाई करा. खरी बातमी हीच की पंतप्रधानांनी निवडणुकीच्या व्यासपीठावरून एक सत्य कबूल केले.

Web Title: Special Article - Low polling in the first phase has raised BJP's anxiety, making Modi emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.