तुमचंच जमेना, तिथं आमचं काय?

By नंदकिशोर पाटील | Published: March 26, 2024 01:12 PM2024-03-26T13:12:12+5:302024-03-26T13:13:29+5:30

दुसरा-ऐकावे जनाचे, करावे मनाचे! लोकशाहीत म्हणे, मतदार राजा असतो. तर मग आपणही जरा राजासारखं वागूया !

political parties not communicate well, what about us? | तुमचंच जमेना, तिथं आमचं काय?

तुमचंच जमेना, तिथं आमचं काय?

१८ व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या टप्प्यातील १९ एप्रिल रोजी होणाऱ्या होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना निघाली आहे. यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. शेजारील गुजरात अथवा राजस्थानमध्ये एका टप्प्यात आणि महाराष्ट्र, प.बंगालमध्ये निवडणुकीचे पाच टप्पे का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा देण्यामागे नेमके कारण काय, असे प्रश्न उपस्थित करायचे नसतात. निवडणूक आयोगाची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. काश्मीर ते कन्याकुमारी अशा आसेतू हिमाचल अखंड भारतवर्षातील लोकशाहीच्या या कुंभमेळ्यात सर्वच गोष्टी सर्वांच्या मर्जीने होणे नाहीत. विशेषांची विशेष काळजी घेतली की पुरे!

असो; जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकशाहीचा महोत्सव असे सार्थ वर्णन केले गेलेल्या या राजकीय कुंभमेळ्यासाठी आखाडे सजले असले तरी, जागावाटपातील मानापमान नाट्य अजून संपलेले नाही. किंबहुना त्यात रोज नव्या पात्रांची एन्ट्री होत असल्याने हे नाट्य उत्तरोत्तर अधिक रंगतदार होऊ लागले आहे; मात्र ठरलेल्या स्क्रीप्टप्रमाणे हे नाट्य पुढे सरकत नसल्याने सूत्रधार आणि निर्मात्यांची पुरती दमछाक होताना दिसते. बरे, ज्यांच्यासाठी हे नाटक सादर करावयाचे ती प्रेक्षकरूपी जनता पुरती गोंधळात पडली आहे. रोज नवे दावे-प्रतिदावे सुरू असल्याने पात्रांचाही गोंधळ उडालेला दिसतो. लोकशाहीच्या ‘वस्त्रहरणा’चा हा खेळ ‘रोख्या’च्या आकड्याने तर अधिक बीभत्स झाला आहे. ज्यांची कमाईच मुळात आठण्णी आहे, त्यांनी केलेली दौलतजादा सर्वसामान्यांच्या आकलनशक्तीला मोठेच आव्हान आहे. कोणाच्या खात्यात किती आले, याचे हिशेब पाहिले तर आपल्या देशातील श्रीमंतीचा गर्व वाटू लागतो. १४० कोटी देशातील ८० कोटी गरिबांना आपण मोफत अन्नदान करतो ते उगीच नाही!

असो; तर विषय होता. जागावाटपाचा. काल-परवापर्यंत जे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते अथवा जे एकमेकांना पाण्यात पाहत होते; त्यांचीच सोयरीक झाल्याने देण्या-घेण्याची बोलणी लांबणारच. या नव्या राजकीय सग्यासोयऱ्यांतील गोतावळ्याची सोय लावता-लावता थोडी दमछाक होणार, हे आपण समजून घेतले पाहिजे. खरं म्हणजे, आपणांस अजून बरंच काही समजून घेण्यासारखं आहे. ‘काही झाले तरी मी अमुक-तमुकास आमच्या पक्षात कदापि घेणार नाही. तशी वेळ आलीच तर राजकीय संन्यास घेईन!’ हे ऐतिहासिक विधान कोणी, कोणासाठी, कधी आणि का केले होते, हे विचारत बसायचे नाही. किंवा ‘लाव रे तो व्हिडीओ’ नावाचा करमणूकप्रधान एकपात्री प्रयोग करणाऱ्यांनी अचानक आपल्या अंगावरील शाल का झटकली, असे देखील विचारायचे नाही. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘आदर्शा’चे ‘सिंचन’ गंगेला मिळून पवित्र होणार असेल तर आपली हरकत काय? नाहीतरी सर्व गटारी शेवटी गंगेलाच तर मिळतात... आपण आपल्या नाकातोंडात पाणी शिरू नये म्हणून नाक दाबून, डोळे बंद करून डुबकी मारायची!

असो; मुद्दा काय तर, जागावाटपाचे घोडे नेमके कुठे अडलेय! घोड्याच्या काही खोडी असतात. कितीही खाकरा केला तरी ऐनवेळी तो कसा उधळेल, याचा भरवसा नसतो. या तबेल्यात तर निरनिराळ्या जातींचे, वर्णाचे, सवयीचे घोडे. काही घोडेबाजारातून आणलेले, तर काही दुसऱ्या तबेल्यातून पळविलेले! या साऱ्यांची सोय कशी लावायची? मैदानात उतरण्यासाठी तर सारेच उतावीळ आहेत. बरे, समोरून कोणता काठेवाडी मैदानात उतरेल याचा अंदाज येत नसल्याने तालेवार देखील ताटकळलेत! शिवाय, तबेल्यातील धुसफूस, राजी-नाराजी कशी शमवायची, हा देखील मोठाच प्रश्न आहे की!

असो; तर मग आपण काय करायचे? हा प्रश्न आहेच. कारण. काल-परवापर्यंत आपण ज्यांचे पाठीराखे होतो, त्यांनीच आपणास पाठ दाखवल्याने आपली तर मोठीच पंचायत होऊन बसली आहे. आपल्यापुढे तसे अनेक पर्याय आहेत; पण त्यातल्या त्यात दोन सशक्त पर्याय आहेत. ते असे- एक म्हणजे, ते देतील तो गडी आपला मानून त्याची पाठराखण करायची. दुसरा-ऐकावे जनाचे, करावे मनाचे! लोकशाहीत म्हणे, मतदार राजा असतो. तर मग आपणही जरा राजासारखं वागूया !

Web Title: political parties not communicate well, what about us?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.