प्रियांका गांधी मैदानात उतरणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 08:03 AM2024-03-28T08:03:53+5:302024-03-28T08:05:00+5:30

Lok Sabha Election 2024 : प्रियांका गांधी-वड्रा या रायबरेलीतून निवडणूक लढवायला नाखुश असल्याची चर्चा आहे. पक्षातील घडामोडींबाबत त्या नाराज असाव्यात!

Lok Sabha Election 2024 : Will Priyanka Gandhi enter the field or not? | प्रियांका गांधी मैदानात उतरणार की नाही?

प्रियांका गांधी मैदानात उतरणार की नाही?

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

काँग्रेस पक्ष लोकसभेच्या अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांबाबत अजूनही पत्ते खुले करायला तयार नाही. अशा स्थितीत भाजपनेही या दोन्ही मतदारसंघांतील आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उत्तर प्रदेशमधून जाहीर करण्यात आलेल्या ६४ उमेदवारांच्या यादीत स्मृती इराणी यांचे नाव आहे. भाजप या राज्यात लोकसभेच्या ८० पैकी ७६ जागा  लढणार आहे. राहुल गांधी हे अमेठीतून लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसची समाजवादी पक्षाशी आघाडी आहे. हा पक्ष १७ जागा लढणार असून, पैकी नऊ जागांचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. प्रियांका गांधी-वड्रा या रायबरेलीतून निवडणूक लढवायला नाखुश असल्याची चर्चा आहे. १० जनपथ वरून मिळालेल्या माहितीनुसार पक्षात जे काही चालले आहे, त्याबाबत त्या नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पक्षात त्यांना दूर ठेवले जात असून, सुजन सिंह पार्क या त्यांच्या घरीच त्या बहुतांश वेळ असतात. त्यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१९ साली भाजपने अमेठीची जागा प्रतिष्ठेची केली होती. यावेळी पक्षाची तयारी रायबरेलीसाठी आहे.

 ‘आप’चा उगवता तारा : भगवंत मान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गजाआड गेले असताना आता सर्वांच्या नजरा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्यावर खिळल्या आहेत. नजीकच्या काळात कोणतेही अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता नसली तरी चर्चा अशी आहे, की केजरीवाल यांच्या पत्नीला मुख्यमंत्रिपदावर बसवणे तेवढे सोपे असणार नाही. पक्षाचे प्रभारी निमंत्रक होणेही तसे कठीण आहे. मनीष सिसोदिया किंवा संजय सिंह यांना दारू धोरण घोटाळ्यात थोडा दिलासा मिळालेला असल्याने आता केजरीवाल यांनाही तो तसा मिळतो काय, हे पाहावे लागेल. 
पक्षापुढे खूप मोठा आर्थिक पेचप्रसंग असून, दररोजचा खर्च भागवणेही मुश्कील झाले आहे. तपास यंत्रणांची बारीक नजर असल्यामुळे पक्षाचे देणगीदार आणि सहानुभूतीदार यांच्यातही भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांसाठी निधीची तरतूद करण्याची जबाबदारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्याकडे जात असल्याने सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे आहे. पदानुसार ज्येष्ठतेच्या प्राधान्यक्रमात  केजरीवाल यांचा नंबर चौदावा असून, मान यांचा सातवा लागतो. दुसरे म्हणजे त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत. सीमेवरील राज्याचे मुख्यमंत्री असल्याने केंद्रही त्यांच्या बाबतीत काळजी घेते. भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वावर टीका करताना मान शब्द काळजीपूर्वक निवडतात. आप आणि काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येऊ नयेत अशी भाजपची इच्छा होती; तरीही मान यांनी या बाबतीमध्ये अत्यंत कणखर भूमिका घेतली आणि त्यांचेच म्हणणे टिकले, याचीही नोंद घेतली पाहिजे.

उपराष्ट्रपती, पंतप्रधानांचे नवे घर
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान लवकरच नव्या निवासी संकुलात जातील. धनखड बहुधा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नव्या घरात जातील अशी शक्यता आहे.  उपराष्ट्रपतींचे नवे निवासी संकुल हे १५ एकर जागेत असून, २० हजार चौरस फुटांची वास्तू बांधलेली जागा तेथे आहे. या एकमजली घराच्या बाजूला सचिवालयाची इमारत, अभ्यागत निवास, क्रीडा सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी निवारा आणि अन्य सेवांसाठी ही इमारत असेल. नरेंद्र मोदी सरकारच्या भव्य केंद्रीय पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणजे उपराष्ट्रपतींचे हे घर. 
त्याच्या बाजूलाच पंतप्रधानांचे नवे घर असेल. या अत्याधुनिक नव्या निवासी संकुलात सुरक्षेची सर्व ती काळजी घेतली गेली आहे.
जानेवारी २०२२ मध्ये या घरांचे बांधकाम सुरू झाले. मोदींचा केंद्रीय पुनर्विकास प्रकल्प १३,५०० कोटी रुपयांचा असून, त्यातला २१४ कोटी रुपयांचा हा तिसरा प्रकल्प भाग पूर्ण होत आहे. यानंतर कर्तव्य पथावर (राजपथ) दोन्ही बाजूंना केंद्रीय सचिवालयाच्या १० इमारती उभ्या केल्या जाणार आहेत.

गांधींचे काँग्रेसला मतदान नाही! 
सोनिया, राहुल आणि प्रियांका हे गांधी कुटुंबातील तीन सदस्य कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या पक्षाला मत देऊ शकणार नाहीत. जागावाटप सूत्रानुसार नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ  ‘आप’च्या वाट्याला गेल्याने गांधी कुटुंबीय काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ शकणार नाहीत. ‘आप’ने सोमनाथ भारती यांना या मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी दिली असून, भाजपने बान्सुरी स्वराज यांना उभे केले आहे. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या त्या कन्या आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2024 : Will Priyanka Gandhi enter the field or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.