बहीण पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ धनंजय मुंडेंची भर पावसात तुफानी सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 02:58 PM2024-05-11T14:58:02+5:302024-05-11T15:00:28+5:30

एकीकडे डोक्यावर कोसळणारा अवकाळी पाऊस तर दुसरीकडे 'धनंजय मुंडे आप आगे बढो', 'पंकजाताई आप आगे बढो...' अशा जोशपूर्ण घोषणा देत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

Dhananjay Munde's stormy meeting in the rain for sister Pankaja's campaign | बहीण पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ धनंजय मुंडेंची भर पावसात तुफानी सभा

बहीण पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ धनंजय मुंडेंची भर पावसात तुफानी सभा

परळी : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांची परळी वैद्यनाथ शहरातील बरकतनगर भागात भर पावसात तुफान सभा पार पडली. एकीकडे डोक्यावर कोसळणारा अवकाळी पाऊस तर दुसरीकडे 'धनंजय मुंडे आप आगे बढो', 'पंकजाताई आप आगे बढो...' अशा जोशपूर्ण घोषणा देत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

परळी वैजनाथ शहरात सर्व हिंदू - मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात.  आमच्या सेवा धर्मामध्ये कधीही जात धर्म आडवा आला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत कधी येणारही नाही. इथल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आहे. इथल्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी मिठी मारण्यापासून ते मतदान रुपी आशीर्वाद देण्यापर्यंत मला वेळोवेळी पाठबळ दिलं आहे. आता हेच पाठबळ माझी बहीण पंकजाताई यांच्या पाठीशी उभं करायचं  असल्याचा विश्वास कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील बरकत नगर भागात झालेल्या सभेत बोलताना व्यक्त केला आहे. 

स्व. गोपीनाथराव मुंडे तसेच माझे वडील स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे आणि मुस्लिम समाजाचे अतूट प्रेम बंध होते. आम्हीही पुढच्या पिढीमध्ये तोच भाव जपला आहे. त्यामुळेच इथे आमचे समाजकारण व राजकारण हे जात-पात आणि धर्माच्या पलीकडच्या आहे हे सर्वांना ठाऊक आहे. आज मनामनात जाती-धर्माच्या नावावरून बुद्धिभेद पसरवला जात असताना परळीतील मुस्लिम समाज मात्र केवळ आणि केवळ विकासाच्याच पाठीशी उभा राहील असा मला विश्वास असल्याचेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. 

नुकतीच सीरसाळा एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आगामी काळात परळी वैजनाथ शहर व तालुक्यामध्ये वेगवेगळ्या उद्योगांची उभारणी त्यातून केली जाणार आहे. रोजगारांची निर्मिती, वेगवेगळे प्रकल्प अशा माध्यमातून आपल्या भागात मोठ्या प्रमाणात विकास साधला जावा यासाठी केंद्र सरकारमध्ये आपल्या हक्काचा माणूस असावा म्हणून पंकजाताईंना निवडून देणे हे परळीकरांचे आद्य कर्तव्य आहे; असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. 

यावेळी रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,माजी उपनगराध्यक्ष आय्युबभाई पठाण,शकील कुरेशी, राजा खान,इस्माईल पटेल,शहर सरचिटणीस अनंत इंगळे, शंकर आडेपवार, विजय भोयटे,नाजेर हुसेन, अल्ताफ पठाण, रवि मुळे, शेख शम्मो, लालाखान पठाण यांसह मोठया प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Web Title: Dhananjay Munde's stormy meeting in the rain for sister Pankaja's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.