world book day : पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव महापुरुष ‘बाबासाहेब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 07:29 PM2019-04-23T19:29:03+5:302019-04-23T19:37:51+5:30

बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल’ या पुस्तकाची मूळ प्रत मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे.

world book day: The only great man to build a house for books 'Dr. Babasaheb Ambedkar' | world book day : पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव महापुरुष ‘बाबासाहेब’

world book day : पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव महापुरुष ‘बाबासाहेब’

googlenewsNext
ठळक मुद्देबाबासाहेबांनी १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केली. अत्यंत महत्त्वाचे व दुर्मिळ असलेले सुमारे ११०० ग्रंथ मिलिंद महाविद्यालयात

- विजय सरवदे 

औरंगाबाद : ‘पुस्तकांसाठी घर बांधणारे’ बाबासाहेब हे जगातील एकमेव महापुरुष आहेत. ज्या ग्रंथांवर बाबासाहेबांनी जिवापाड प्रेम केले, त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे व दुर्मिळ असलेले सुमारे ११०० ग्रंथ त्यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयास दिले आहेत. परंतु ग्रंथांचा हा ठेवा वाचण्यासाठी ना प्राध्यापकांना वेळ आहे, ना विद्यार्थ्यांना. सद्य:स्थितीत यापैकी अनेक दुर्मिळ ग्रंथ जीर्ण होत चालले असून ते जतन करण्यासाठी महाविद्यालयाची धडपड सुरू आहे.

वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तक दिन पोरकाच म्हणावा. इंटरनेटच्या या युगात वाचन संस्कृतीला आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा विनाकारण संबंध जोडला जातो. अलीकडे आई- वडील  आणि मुलं, किंवा विद्यार्थी- शिक्षक हे एकत्रितपणे वाचन करीत बसले आहेत, असे चित्र क्वचितच पाहावयास मिळत असेल. वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली असल्यामुळे ग्रंथालयांनाही अवकळा आलेली आहे.

बाबासाहेबांनी १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केली. महाविद्यालयाच्या उभारणीनिमित्त ते जेव्हा केव्हा दिल्ली अथवा मुंबईहून औरंगाबादेत येत, तेव्हा सोबत अतिशय मौलिक ग्रंथ आणीत असत. तहान भूक विसरून ते ग्रंथांचे वाचन करीत असत. मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील काही ग्रंथ चाळले, तेव्हा बाबासाहेबांनी किती बारकाईने ग्रंथांचे वाचन केलेले आहे, त्याचा प्रत्यय येतो. अनेक पुस्तकांवर त्यांनी पेन्सिल, पेनाने टिपणे काढलेली असून, बाजूला स्वत:ची स्वाक्षरी व त्याखाली तारीख नमूद केलेली आहे.

बाबासाहेबांनी मिलिंद विज्ञान महाविद्यालयास दिलेली राज्यघटना, कायदा, धर्मशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, कुराण, बायबल, विज्ञान, उद्यानशास्त्र तसेच इंग्रजी व मराठी भाषा वाङ्मयाची दुर्मिळ पुस्तके ग्रंथालयात पाहावयास मिळतात. ‘दी होली बायबल’ हा ग्रंथ त्यांना कॅलिफोर्निया येथील एस.एन.आय. स्मिथ यांनी १९३६ साली भेट दिला होता. तो ग्रंथ, याशिवाय बायबलचे नवा आणि जुना करार या ग्रंथाचे अनेक भाग, कुराण, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत कबीर आदी दुर्मिळ पुस्तके, ‘एज आॅफ नंदाज अँड मौर्याज’, ‘अकबर-दि ग्रेट मोगल’ त्याशिवाय ‘ह्यूमन न्यूट्रीशन अँड डायट’ अशा अनेक विषयाला स्पर्श करणारी पुस्तके पाहून बाबासाहेबांची केवढी विद्वत्ता होती, हे स्पष्ट होते.

मात्र, या महामानवाने ज्या उद्देशाने हा ग्रंथ ठेवा येथे दिला, तो उद्देश सफल झाला? हा संशोधनाचा विषय होईल. माझ्या समाजाने शिकले पाहिजे. उच्चशिक्षित झाले पाहिजे, ज्ञानाची सर्व शिखरे पार केली पाहिजे, असा बाबासाहेबांचा आग्रह होता. अलीकडे, हा दुर्मिळ ग्रंथ ठेवा हाताळण्यासाठी कोणालाही दिला जात नसला, तरी पूर्वी १९८० पर्यंत ग्रंथालयात बसून वाचण्यासाठी तो दिला जायचा. तेव्हा आंबेडकरांच्या विविध पैलूंवर संशोधन करणाऱ्या काही अभ्यासकांनी मात्र या पुस्तकांचा लाभ घेतल्याचे बोलले जाते.

बाबासाहेबांची अत्युल्य ग्रंथसंपदा
बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल’ या पुस्तकाची मूळ प्रत मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे. पुढे याच पुस्तकाचे नाव बाबासाहेबांनी ‘बुद्धा अँड हिज धम्मा’ असे बदलले. स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून ज्याला संबोधले जाते, त्या ‘हिंदू कोड बिल’ची मूळ प्रतदेखील या ग्रंथालयात आहे. या प्रतीवर स्वत: बाबासाहेबांनी पान क्रमांक २५, ३५, ४०, ५२, ५३, ५४ आणि १३४ वर दुरुस्त्या सुचविलेल्या आहेत. त्यांचा जगभर गाजलेला ‘दी प्रॉब्लेम आॅफ रुपी- इटस् ओरिजीन अँड इटस् सोल्युशन’ या ग्रंथाची प्रतही येथे आहे. छोट्याशा डबीत मावेल एवढ्या आकाराचे पवित्र कुराण येथे असून, ते ८ सें.मी. रुंद व २० फूट लांब आहे.

Web Title: world book day: The only great man to build a house for books 'Dr. Babasaheb Ambedkar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.