EVMवर लोकांचा विश्वास नाही; न्यायलयाने गांभीर्याने विचार करायला हवा होता!

By शिवाजी पवार | Published: April 27, 2024 04:02 PM2024-04-27T16:02:44+5:302024-04-27T16:04:54+5:30

संजय राऊत यांनी व्यक्त केलं रोखठोक मत

People do not trust EVMs; Court should have seriously considered! | EVMवर लोकांचा विश्वास नाही; न्यायलयाने गांभीर्याने विचार करायला हवा होता!

EVMवर लोकांचा विश्वास नाही; न्यायलयाने गांभीर्याने विचार करायला हवा होता!

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम विरोधातील सर्व याचिका शुक्रवारी फेटाळल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. ईव्हीएम वापरा विरोधात लोक रस्त्यावर उतरले. मतदान एका पक्षाला करूनही ते दुसरीकडेच नोंदवले जाते असा आक्षेप आहे. लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासच उडाला आहे. त्यामुळे पब्लिक क्राय लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घ्यायला हवे होते असे राऊत म्हणाले.

शिर्डी मतदारसंघातील अकोले येथे प्रचार सभेसाठी संजय राऊत, अनिल देसाई हे शुक्रवारी आले होते. यावेळी शिर्डी विमानतळावर प्रसार माध्यमांशी राऊत बोलत होते. शिवसेना नेते अशोक थोरे, संजय शिंदे, जयंत पवार हे यावेळी उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप करण्याचा गंभीर गुन्हा दाखल होता. त्यांच्यासह प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांच्यावरील गुन्ह्यांची चौकशी थांबवण्यात आली, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच अटक करणार होते. त्यामुळे ते शिवसेना सोडून गेले असाही आरोप राऊत यांनी केला आहे.

राऊत म्हणाले, विरोधकांचे फोन टॅप करण्याचा गुन्हा जागतिक स्तरावर गांभीर्याने घेतला गेला असता. कोणत्याही देशात या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकली असती. मात्र फडणवीसांवरील या आरोपाची चौकशी थांबविण्यात आली. दरेकर हे मुंबई बँकेतील घोटाळ्याचे आरोपी होते. गिरीश महाजनावरही गंभीर आरोप होते. मात्र या सर्वांची चौकशी आता थांबविण्यात आली आहे. सरकारने किमान गुन्ह्यांचा तपास पूर्ण करायला हवा होता. 

Web Title: People do not trust EVMs; Court should have seriously considered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.